रत्नागिरी: अंमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे.के. फाईल, एमआयडीसी परिसरात पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना एका संशयित व्यक्तीची चौकशी करण्यात आली.
त्यावेळी एका व्यक्तीकडे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या इसमाच्या ताब्यातील गांजा आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण ६४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अंमली पदार्थ तस्करांविरोधातील पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.





