मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्याला बळ देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशन आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या माध्यमातून राज्यातील तब्बल २० लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. दृष्टिदोष आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘व्हिजन फॉर ऑल’ या शालेय नेत्र आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात येईल. ऑगस्ट २०२६ ते जून २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.
सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या या कराराच्या वेळी राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी, वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशनचे संचालक व एसिलोरलक्सोटिका ग्रेटर इंडियाचे अध्यक्ष वेणुअंबाती तसेच रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता उपस्थित होते.
या उपक्रमात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार असून, शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासह शाळास्तरावरील नेत्र तपासणी उपक्रमांचे समन्वयन केले जाणार आहे. रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टकडून पात्र नेत्रचिकित्सा पथके तैनात करून विद्यार्थ्यांची अपवर्तन तपासणी केली जाणार असून, पात्र विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्याचे कामही केले जाणार आहे. वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशनकडून या कार्यक्रमाला तांत्रिक सहकार्य आणि नेत्र आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञता पुरविण्यात येणार आहे.
२०१९ पासूनचा उपक्रम; आतापर्यंत ६.८ लाख विद्यार्थ्यांची तपासणी
ही भागीदारी २०१९ पासून सुरू असलेल्या शालेय नेत्र आरोग्य उपक्रमाचा पुढील टप्पा आहे. आतापर्यंत राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८०० शाळांमध्ये ६.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ६३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमधील दुरुस्त न केलेले अपवर्तन दोष हे दृष्टिदोषाचे एक प्रमुख कारण असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर, वर्गातील सहभागावर आणि आत्मविश्वासावर होऊ शकतो. त्यामुळे शालेय स्तरावरच दृष्टिदोषाचे निदान करून योग्य वेळी उपचार व चष्मे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘दृष्टिदोष लवकर ओळखणे गरजेचे’
शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादा भुसे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. चांगली दृष्टी ही विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचा पाया असून, शासकीय शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेवर नेत्र तपासणी व आवश्यक सेवा मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाची व्यापक शैक्षणिक यंत्रणा, रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टची अंमलबजावणीतील क्षमता आणि वनसाइट एसिलोरलक्सोटिका फाउंडेशनची तांत्रिक तज्ज्ञता यांच्या माध्यमातून राज्यभर शालेय नेत्र आरोग्याचे प्रभावी आणि विस्तारण्याजोगे प्रारूप उभे करण्याचा प्रयत्न या भागीदारीतून केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील २० लाख विद्यार्थ्यांची होणार नेत्र तपासणी; शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा
Leave a Comment







