महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; शिक्षण विभागाला ‘मिशन मोड’वर काम करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Gramin Varta
84 Views

मुंबई : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक आणि दृश्यमान बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम पोहोचवण्यासोबतच शाळांचे आधुनिकीकरण, शिक्षकांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट व कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

आजच्या विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अपेक्षा बदलत असल्याने त्यानुसार शाळांच्या कार्यपद्धतीतही आवश्यक बदल करणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि कौशल्यवृद्धीवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना योग्य सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, कृती आराखडा तयार करताना शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अनुभवी शिक्षकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचा विकास केवळ अभ्यासक्रम आणि परीक्षांपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाला प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर शाळांच्या विकासामध्ये पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळांच्या पायाभूत सुविधा आणि आधुनिकीकरणासाठी आमदार व खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील शाळा दत्तक घेऊन विकासकामांना हातभार लावावा, असे आवाहन केले जाणार आहे. तसेच कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची व्यावसायिक मदत घेऊन शाळांना तंत्रज्ञान, कौशल्य, प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या संपूर्ण कृती आराखड्याची अंमलबजावणी योग्य दिशेने सुरू आहे की नाही, यासाठी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. शाळांच्या गुणवत्तेत सकारात्मक आणि प्रत्यक्ष बदल घडवून आणत विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षण विभागाने ठोस परिणाम दिसतील अशा पद्धतीने काम करावे, असा स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिला.

Total Visitors :
4754737
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *