ब्रेकिंग: अनुस्कुरा घाटात अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत; क्रेनच्या सहाय्याने वाहन हटविण्याचे प्रयत्न सुरू

Gramin Varta
165 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: अनुस्कुरा घाटामध्ये मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास एका अवजड चारचाकी वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन घाटातच थांबले. यामुळे घाट मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, घटनेनंतर जवळपास तीन तास उलटूनही मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेली नव्हती.

सध्या घाट मार्गावरून केवळ दुचाकी आणि लहान वाहनांना टप्प्याटप्प्याने मार्ग देण्यात येत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, बंद पडलेले वाहन हटविण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन हटविल्यानंतरच वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे मेजर दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाटगे, रामदास पाटील, संपत पाटील, सुशांत लवटे, रायपाटणचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण तसेच पाचल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षद तेलंग, विहंग खानविलकर आणि अजय खानविलकर यांनी वाहतुकीचे नियोजन करत वाहनांना मार्ग करून देण्यासाठी सहकार्य केले.

दरम्यान, पाचलहून कोल्हापूर, पुणे अथवा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी तात्पुरते पाचल येथेच थांबावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. तसेच कुटुंबासह प्रवास करणाऱ्या लहान वाहनधारकांनीही परिस्थिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

वाहन हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच घाटातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Total Visitors :
4760807
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *