रत्नागिरी: ‘काय वर्णू ती मी शोभा, आजच्या दिनाची, भेट झाली पहा ओ भैरी शिवाची…’ या अभंगाच्या निनादात आणि हजारो भाविकांच्या भक्तीमय वातावरणात राजिवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरीबुवा यांच्या पालख्यांचा अपूर्व भेट सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. परंपरेनुसार या दोन बंधूंच्या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी रत्नागिरी शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी राजिवडा परिसरात मोठी गर्दी केली होती.
श्रावणातील पहिल्या सोमवारी दोन्ही मंदिरांमध्ये अखंड नामसप्ताहाला प्रारंभ झाला होता. दुसऱ्या सोमवारी नामसप्ताहाची सांगता झाल्यानंतर दोन्ही देवतांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मांडवी येथून निघालेली श्रीदेव भैरीची पालखी विठ्ठल मंदिर, तेलीआळी नाका, खडपेवठार मार्गे राजिवडा धारेवरून काशीविश्वेश्वर मंदिराच्या दिशेने दाखल झाली. मंदिराजवळ येताच ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंगाचा नाद आणि भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
श्रीदेव काशीविश्वेश्वराच्या पालखीच्या पाच प्रदक्षिणा सुरू असताना, तिसऱ्या प्रदक्षिणेदरम्यान श्रीदेव भैरीच्या पालखीची समोरासमोर भेट झाली. तत्पूर्वी दोन्ही पालख्यांसोबत असलेल्या अब्दागीर आणि वीणा यांची परंपरेप्रमाणे भेट घडवून आणण्यात आली. यानंतर दोन्ही पालख्यांची गळाभेट होताच उपस्थित भाविकांनी एकच जयघोष केला. भक्ती आणि परंपरेचा सुरेख संगम घडवणाऱ्या या नयनरम्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.





