रत्नागिरी : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्याचबरोबर नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर भामट्यांकडून वापरल्या जाणाऱ्या नवनवीन क्लृप्त्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लिंक पाठवून, बँक अधिकारी असल्याचे भासवून किंवा पैशांचे आमिष दाखवून नागरिकांच्या खात्यातून रक्कम लंपास केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पाऊण महिन्यातच जिल्ह्यात सायबर फसवणुकीचे सात गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणांमध्ये तब्बल १ कोटी १९ लाख १९ हजार ४८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीतील चार तर चिपळूणमधील एका प्रकरणासह अन्य घटनांमध्ये नागरिकांना सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढले.
मोबाईलवर आलेली अनोळखी लिंक उघडणे, एखाद्या व्यक्तीच्या नावाने आलेला संदेश खरा समजणे, एटीएम अथवा बँक खात्याची माहिती सांगणे किंवा डिजिटल अरेस्टच्या भीतीने सायबर भामट्यांच्या सूचनांचे पालन करणे नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. काही प्रकरणांमध्ये गॅस सेवा बंद होणार असल्याचे सांगून मदतीच्या नावाखाली खात्यातून रक्कम काढण्यात आली. तर काहींना बँक अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक व्यवहार करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाला अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. ट्रेडिंगमध्ये कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पती-पत्नीच्या खात्यातूनही लाखो रुपये लंपास करण्यात आले. तसेच दहशतवादाच्या प्रकरणात अटक होण्याची भीती दाखवत एका वयोवृद्ध महिलेची मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आली.
सायबर भामट्यांच्या या वाढत्या कारवायांमुळे नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंकपासून सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीने फोनवरून बँक खाते, एटीएम, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती मागितल्यास ती देऊ नये. मोबाईलमध्ये अनोळखी अॅप इन्स्टॉल करू नये आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न दवडता जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी अथवा सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. फसवणुकीनंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने तातडीने तक्रार केल्यास रक्कम परत मिळविण्याची शक्यता वाढते.
मोबाईलमधील फसव्या लिंक, बनावट अॅप आणि फोनवरील दबावाच्या तंत्राबाबत माहिती नसल्याने ज्येष्ठ नागरिक सायबर भामट्यांच्या सहज लक्ष्य बनत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी आपल्या ज्येष्ठ सदस्यांना अशा फसवणुकीच्या पद्धतींबाबत माहिती देऊन कोणताही संशयास्पद फोन किंवा संदेश आल्यास तातडीने कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे.
रत्नागिरीत सायबर भामट्यांचा धुमाकूळ; पाऊण महिन्यात १.१९ कोटी लुटले, 7 गुन्हे दाखल
Leave a Comment





