मंडणगड : तालुक्यातील दहागाव येथील घरातून सुमारे ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. संशयिताकडून चोरीस गेलेले सुमारे सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी रवींद्र विष्णू जाधव (वय ४९) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.३० वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मंडणगड पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिसांनी विविध बाबींची बारकाईने पडताळणी करत संशयिताचा माग काढला. तपासादरम्यान पवन संभाजी सुतार (वय २७, सध्या रा. मुंबई, मूळ रा. चांदवडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयित पवन सुतार हा फर्निचरचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई मंडणगडचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ आणि उपनिरीक्षक आर. आर. खेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलिसांनी केली.





