रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांविरोधात गुन्हा; सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांच्यासह अनेकांचा समावेश

Gramin Varta
4 Views

पुणे : सोशल मीडिया आणि विविध डिजिटल माध्यमांवर बदनामीकारक तसेच अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलशी संबंधित योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टशी संबंधित अशोक खरात यांच्याशी एका सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्वी भेट झाली होती. खरात यांच्यावर पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर त्यांच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

या फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचे चाकणकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह विविध डिजिटल माध्यमांवरून आपल्याविरोधात अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. काही पोस्ट आणि कमेंट्समध्ये शिवीगाळ, धमकी तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकारामुळे आपली मानहानी झाली असून, सोशल मीडिया कमेंट्सच्या माध्यमातून लैंगिक स्वरूपाचा छळ करण्यात आल्याचा आरोपही चाकणकर यांनी केला आहे. संबंधित पोस्ट, व्हिडिओ, कमेंट्स आणि स्क्रीनशॉट्सचे पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ नेमके कोणी तयार केले, ते कोणाकडून प्रसारित करण्यात आले आणि या संपूर्ण प्रकरणामागे कोणाची भूमिका आहे, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार असून, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची बाजूही तपासाच्या पुढील टप्प्यात महत्त्वाची ठरणार आहे.

Total Visitors :
4755940
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *