नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका सूचक विधानाने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. “आता मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्या वेळी करू शकलो तेव्हा केलं. आता नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे,” असे गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात बोलताना म्हटले. त्यांच्या या विधानामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
गडकरी यांनी आपल्या जुन्या कार्यपद्धतीची आठवण सांगताना, पूर्वी पक्षाचे काम करताना समोसा खाऊन झोपत असल्याचे म्हटले. मात्र, कोरोनानंतर आपल्या जीवनशैलीत शिस्तबद्धता आली असून आता पूर्वीप्रमाणे जास्त काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ज्या वेळी करू शकलो तेव्हा केलं. आता नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे,” या त्यांच्या वक्तव्याकडे राजकीय निवृत्तीचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
देशभरात ई-20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून वाहनधारकांमध्ये नाराजी आणि आंदोलनांची चर्चा सुरू असतानाच गडकरींचे हे विधान समोर आल्याने त्यांच्या भूमिकेतील बदलाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. मात्र, गडकरी यांनी आपल्या वक्तव्यात थेट राजकीय निवृत्तीची घोषणा केलेली नाही.
यावेळी गडकरी यांनी तरुणांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि प्राणायाम करण्याचे आवाहन करताना त्यांनी सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञान यापेक्षा चांगले आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
“तुमची तब्येत चांगली असेल तर उपयोग आहे. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा काय उपयोग आहे?” असा सवाल त्यांनी केला. आयुष्याच्या अंतिम सत्याकडे लक्ष वेधताना गडकरी म्हणाले की, एका क्षणात काहीही होऊ शकते आणि त्या वेळी सत्ता, संपत्ती, बंगला किंवा वाहन यापैकी काहीही सोबत येत नाही. “खाली हात आला आहे, खाली हात जाणार आहे,” असे सांगत त्यांनी जीवनात आरोग्य आणि माणुसकीला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.
गडकरी यांच्या “आता जास्त काम करू शकत नाही” आणि “नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे” या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चेला तोंड फुटले असून, त्यांच्या या सूचक विधानामागे नेमका कोणता राजकीय संकेत आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गडकरींच्या एका वाक्याने राजकीय वर्तुळात खळबळ; नव्या पिढीसाठी घेतला मोठा निर्णय?
Leave a Comment





