मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) राज्यभरातील धाडसत्रामुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असतानाच IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या कारवाईमुळे नव्हे, तर त्यांच्या कथित 26व्या बदलीच्या चर्चेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातून थेट राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे नेमकं काय घडलं? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर खुद्द तुकाराम मुंढे यांनीच या चर्चेवर पडदा टाकत हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
FDAकडून राज्यभरात पनीर, आईस्क्रीमसह विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापेमारी केली जात आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा मानांकनाचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. डॉमिनोज, ब्लिंकइट, इन्स्टामार्टसह विविध कंपन्यांच्या स्टोअर्सवरही कारवाई करण्यात आली आहे. काही दुकानांचे आणि आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे FDA आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले असतानाच त्यांच्या राजस्थान बदलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासकीय कार्यशैलीसाठी परिचित आहेत. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांच्या तब्बल 25 वेळा बदल्या झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता 26वी बदली राजस्थानमध्ये झाल्याची पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडिया आणि विविध मेसेजिंग ग्रुपमध्ये चर्चेला उधाण आले. हिंदी भाषेतील या पोस्टमध्ये मुंढे यांची राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, या दाव्याची सत्यता समोर येताच वेगळेच चित्र स्पष्ट झाले. तुकाराम मुंढे यांनी राजस्थानला बदली झाल्याच्या वृत्ताचे स्पष्ट शब्दांत खंडन केले. “राजस्थानला बदली? माझा राजस्थानशी काय संबंध? मी अशी काही पोस्ट पाहिली नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचे काही कारणही नाही. मी महाराष्ट्र कॅडरचा आहे, माझी महाराष्ट्रातच बदली होऊ शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे सोशल मीडियावर वेगाने पसरलेली तुकाराम मुंढे यांच्या राजस्थान बदलीची पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. FDAच्या धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीची अफवा पसरल्याने चर्चेला मोठे उधाण आले असले, तरी राजस्थानला त्यांची कोणतीही बदली झालेली नसल्याचे खुद्द मुंढे यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.
तुकाराम मुंढेंची 26वी बदली राजस्थानला? सोशल मीडियावरील पोस्टने उडवली खळबळ; अखेर मुंढेंनीच सांगितलं सत्य!
Leave a Comment





