रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या पर्यावरणीय बाबींवर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जाहीर जनसुनावणी घेण्यात येणार आहे. मे. सोशीयेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड, मडगाव, गोवा यांच्या प्रस्तावित ‘नाणार बॉक्साईट ब्लॉक’ प्रकल्पासंदर्भात ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी १४४.९०५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खनन करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामुळे परिसरातील औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सागवे (घोडेपोई) येथील श्री कात्रादेवी मंगल कार्यालयात ही जनसुनावणी होईल. प्रकल्पामुळे प्रभावित होणारे नागरिक, स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणविषयक संस्था आणि संघटनांना यावेळी तोंडी किंवा लेखी स्वरूपात सूचना, हरकती, टीका-टिप्पणी आणि मते मांडता येणार आहेत.
प्रकल्पाशी संबंधित पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल आणि कार्यकारी सारांश अहवाल मराठी तसेच इंग्रजी भाषेत विविध शासकीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रकल्पाची माहिती अभ्यासून जनसुनावणीमध्ये आपली भूमिका मांडता येणार आहे. नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाच्या दृष्टीने ७ सप्टेंबर रोजी होणारी ही जनसुनावणी स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
नाणार बॉक्साईट प्रकल्पावर ७ सप्टेंबरला जनसुनावणी
Leave a Comment






