चिपळूण : शहरातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करत चिपळूण नगरपरिषदेने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाजीनगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, दररोज सुमारे १५ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, खतनिर्मिती आणि बायोगॅस निर्मिती अशा विविध माध्यमातून कचऱ्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे.
शहरातील कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते, तर सुका कचरा प्लास्टिक, कागद, काच आणि इतर घटकांमध्ये वर्गीकृत केला जातो. बांधकाम कचरा तसेच इतर प्रकारच्या कचऱ्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असतानाही त्यावर नियमित प्रक्रिया करण्याची क्षमता प्रकल्पाने निर्माण केली आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून त्याचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. दोन टन ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बायोगॅसच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती केली जात आहे. या उपक्रमामुळे कचरा कमी करण्यासोबतच ऊर्जा निर्मितीलाही हातभार लागत आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानातही चिपळूण नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ५० हजार ते एक लाख लोकसंख्या गटात चिपळूण नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कचरा व्यवस्थापनातील सातत्यपूर्ण कामगिरीचा या यशात मोठा वाटा आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कामगिरीमुळे चिपळूणची क्रमवारीही सातत्याने सुधारली आहे. २०२१ मध्ये राज्यातील ४३व्या क्रमांकावर असलेल्या चिपळूणने २०२२ मध्ये २३व्या क्रमांकावर झेप घेतली. त्यानंतर कोकण विभागातही चिपळूणने आपली आघाडी कायम ठेवली आहे.
नागरिकांकडून घराघरातून कचरा संकलित केल्यानंतर त्याचे योग्य वर्गीकरण करून प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात येते. कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून, शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यावर भर आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यासोबतच कचऱ्यापासून उपयुक्त उत्पादने आणि ऊर्जा निर्माण करण्याचे कामही सुरू आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असून, नागरिकांनी घरच्या घरी ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीत द्यावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनातील ही कार्यपद्धती पर्यावरणपूरक शहराच्या दिशेने चिपळूणची वाटचाल अधोरेखित करणारी ठरत आहे.
घनकचरा व्यवस्थापनात चिपळूणची दमदार कामगिरी; दररोज सुमारे १५ टन कचऱ्यावर प्रक्रिया
Leave a Comment





