जिल्ह्यातील १,४९२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा

Gramin Varta
36 Views
Happy Smiling Indian farmer counting Currency notes inside the greenhouse or polyhouse - concept of profit or made made money from greenhouse farming cultivation.

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली असून, जिल्ह्यातील १ हजार ४९२ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ८९ लाख २९ हजार ७४२ रुपयांचा लाभ मिळाला आहे.

नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६ हजार १९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे.

काही पात्र लाभार्थी अद्याप योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. आधार प्रमाणीकरण न होणे, लाभार्थी मृत असणे, देवस्थान इनाम जमीन तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. अशा प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.

योजनेच्या पुढील टप्प्यातही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली जात आहे.

दरम्यान, कर्जमाफी योजनेबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4767027
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *