स्वच्छतेचे धडे देणाऱ्या चिपळूण पंचायत समितीच्या आवारातच कचऱ्याचे ढीग; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
95 Views

चिपळूण : ग्रामपंचायतींना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणाऱ्या चिपळूण पंचायत समितीच्या आवारातच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात कचऱ्याचे ढीग पडून असल्याने पंचायत समितीच्या स्वच्छता व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंचायत समितीच्या आवारात साचलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या तसेच पंचायत समितीतील कागदपत्रांचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कचरा नियमितपणे हटविला जात नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले डस्टबिनदेखील अनेक दिवसांपासून जागेवर पडून असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीच्या आवारापासून काही अंतरावरून नगरपालिकेची घंटागाडी नियमितपणे जात असतानाही परिसरातील कचरा घंटागाडीत देण्याऐवजी तो तेथेच साठवून ठेवला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाच्या कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पंचायत समितीच्या आवारात कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र खड्ड्याची व्यवस्था असतानाही बाहेरील परिसरात कचरा साचत असल्याने स्वच्छता व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतींना स्वच्छता राखण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या याच पंचायत समितीच्या आवारात अस्वच्छतेचे चित्र दिसून येणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचलेला असतानाही त्याची योग्य विल्हेवाट का लावण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पंचायत समिती प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील कचरा तातडीने हटवावा आणि नियमित कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

Total Visitors :
4740472
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *