भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा; सुभाष देसाईंचे सूचक वक्तव्य

Gramin Varta
191 Views

उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक; ‘महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते’चे संकेत

चिपळूण : शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, ‘भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे,’ असे सूचक वक्तव्य केले. भास्कर जाधव यांनी तळागाळापासून पक्षासाठी काम केले असून, संघटनेसाठी संघर्ष करत अन्याय-अत्याचारांना तोंड दिले आहे. आज ते खंबीरपणे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तर आपल्यालाही आनंद होईल, असे देसाई यांनी सांगितले.

उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला सुभाष देसाई, शिवसेना नेते भास्कर जाधव आणि उपनेते विजय कदम यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भास्कर जाधव यांच्याकडे केवळ रत्नागिरी किंवा कोकणाची जबाबदारी नसून, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचेही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेतृत्वाचा विचार केवळ कोकणापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र जिंकण्याचा आहे. त्यामुळे आगामी काळात भास्कर जाधव यांच्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

- Advertisement -

दरम्यान, कोकणात ठाकरे शिवसेनेला चांगले वातावरण असून उत्तर रत्नागिरीतील बैठकीला झालेली पदाधिकाऱ्यांची उपस्थिती त्याचे द्योतक असल्याचा दावा देसाई यांनी केला. आगामी तीन वर्षांत पक्षसंघटना अधिक मजबूत केली जाईल आणि महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत जात असल्याचा आरोप करत देसाई यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. उद्योगांचे विस्तार प्रकल्पही अन्य राज्यांकडे वळत असून सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे ते म्हणाले. इतर राज्ये पुढे जात असताना महाराष्ट्र सरकारने जागे होऊन उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातील प्रश्नावर भाष्य करताना, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे देसाई म्हणाले. आपल्याला व्यापक राजकारणाकडे पाहायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून तयार झालेला शिवसैनिक आजही खंबीर असल्याचे सांगत शिवसेना आगामी काळात आणखी मजबूत होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. जनतेच्या मनात खदखद असून वातावरण बदलत आहे. आगामी काळात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडतील आणि महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Total Visitors :
4740470
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *