रत्नागिरी : जिल्ह्यातील तरुणाईमध्ये वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी ड्रग्स विक्रीचे जाळे आणि त्यामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः शहरी भागातील तरुणाई अंमली पदार्थांच्या व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचा मुद्दा मनसेने निवेदनातून उपस्थित केला. कोकेन, अफू, चरस, गांजा आदी अंमली पदार्थांची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब असून, त्यामुळे देशाचे भवितव्य असलेल्या युवा पिढीचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे मनसेने म्हटले आहे.
रत्नागिरी शहरातील महाविद्यालये, शाळा तसेच निर्जन ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पेडलर्सचा वावर असल्याचा दावा मनसेने केला आहे. अशा संवेदनशील ठिकाणी पोलिस प्रशासनाने विशेष पथके तैनात करून नियमित गस्त आणि निगराणी वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
केवळ छोट्या हस्तकांवर कारवाई नको, मुख्य सूत्रधारांवर घाला
अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेले काही तरुण पुढे या अवैध विक्रीच्या साखळीचा भाग बनण्याची शक्यता असते. त्यातून भविष्यात गंभीर गुन्हेगारीला खतपाणी मिळू शकते, अशी चिंता मनसेने व्यक्त केली. त्यामुळे केवळ व्यसनाधीन तरुण किंवा ड्रग्स विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या हस्तकांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. अंमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे असलेल्या मुख्य सूत्रधारांचा आणि पुरवठादारांचा शोध घेऊन त्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी मनसेने केली. या मोहिमेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेल, तसेच पोलिसांच्या सहकार्याने अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यासही पुढाकार घेऊ, असे मनसेने स्पष्ट केले.
ड्रग्स माफिया आणि अंमली पदार्थांच्या पुरवठादारांना गजाआड करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, मार्विक नारकर, मनोज इंदुलकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरीतील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात; मनसेची पोलिस अधीक्षकांकडे कठोर कारवाईची मागणी
Leave a Comment





