चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने अचानक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. मात्र, तिच्यासोबत असलेल्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचल्याने मोठा अनर्थ टळला.
नंदिनी भूपेंद्र पवार (३४) या गुरुवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना अचानक मगरीने त्यांच्या पायाला पकडले. त्यामुळे त्या पाण्यात ओढल्या जाऊ लागल्या. आईचा जीव धोक्यात आल्याचे लक्षात येताच दहा वर्षांच्या स्वर्णाने धाडस दाखवत आईचा हात घट्ट पकडला. स्वतःची सर्व शक्ती पणाला लावत तिने आईला पाण्याबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे नंदिनी यांचा जीव वाचला.
मात्र, मगरीच्या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखम खोल असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखम पूर्णपणे भरून येण्यासाठी किमान १५ दिवस उपचार सुरू राहण्याची शक्यता असून, उपचारासाठी दररोज दोन हजार रुपयांहून अधिक खर्च येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
घटनेनंतर नंदिनी यांचे पती भूपेंद्र पवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी होणारा खर्च वन विभागाकडून मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मगरीच्या हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांनी कुटुंबीयांची भेट घेऊन कौतुक केले. मात्र, प्रत्यक्ष उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असताना मदतीचा हात पुढे आला नसल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. नदीपात्रालगतच्या परिसरात मगरींचा वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.
वन विभागाकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मदतीबाबत कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वन अधिकारी सरवर खान यांनी दिली.
मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेकडे वनविभागाकडून दुर्लक्ष
Leave a Comment






