रत्नागिरी : महावितरणच्या टेंडर प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून दिशाभूल केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कंत्राटदाराविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महावितरणच्या निविदा प्रक्रियेत सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या सत्यतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २७ डिसेंबर २०२५ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत महावितरण परिमंडळ कार्यालय, नाचणे रोड, रत्नागिरी येथे घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अनुराधा सुरेशराव आंधनसरे यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीनुसार, आरोपी कंत्राटदार अतल शिवाजी बेले (रा. सैनिकनगर पूर्व, वानलेसवाडी, मिरज, जि. सांगली) यांनी यापूर्वीच्या EEC/RTN/eT-33/2025-26 या टेंडरसाठी वापरलेल्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर क्रमांक DR115292 ची पीडीएफ फाईल कथितरीत्या एडिट केली. त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावर संबंधित टेंडरचा मजकूर तयार करण्यात आला आणि सदर कागदपत्राचा वापर EEC/RTN/eT-36/2025-26 या टेंडरसाठी ‘डिक्लरेशन बॉन्ड’ म्हणून केल्याचा आरोप आहे.
निविदा मिळविण्याच्या उद्देशाने तसेच महावितरणची दिशाभूल करण्यासाठी बनावट स्वरूपातील कागदपत्राचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३३६(२), ३३६(३), ३४०(२) तसेच संबंधित जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ४१७, ४६५, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू असून, संबंधित निविदा कागदपत्रे, स्टॅम्प पेपरची सत्यता आणि पीडीएफ फाईलमध्ये करण्यात आलेल्या कथित फेरफाराबाबत तपास केला जात आहे.
रत्नागिरीत महावितरणच्या टेंडर प्रक्रियेत बनावट स्टॅम्प पेपरचा वापर; कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल
Leave a Comment





