रत्नागिरी : उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी आरंशा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यादव यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला.
निलेश माईंनकर यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय कामकाजासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या बदलीनंतर त्यांच्यावर पालघर येथे नवीन प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आरंशा यादव या २०२३ बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत २०२२ मध्ये देशात २०१ वा क्रमांक मिळविला आहे. हरियाणा राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या यादव यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी ऑनर्सची पदवी घेतली असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
यादव यांची सुरुवातीला गुजरात केडरसाठी निवड झाली होती. विवाहानंतर त्यांचे महाराष्ट्र केडरमध्ये स्थानांतरण झाले. महाराष्ट्रात त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, महिला व बालकांची सुरक्षा तसेच नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण यावर यादव यांच्या कार्यपद्धतीची छाप राहण्याची अपेक्षा आहे. तरुण आणि उच्चशिक्षित IPS अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने रत्नागिरी उपविभागातील पोलीस प्रशासनाला अधिक गतिमानता मिळण्याची शक्यता असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रत्नागिरी : आरंशा यादव यांनी स्विकारला उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार
Leave a Comment





