प्रथम क्रमांकासह विविध पारितोषिकांवर विद्यार्थ्यांची मोहोर
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या संगणकशास्त्र विभागातर्फे आयोजित फिनिक्स सॉफ्टवेअर स्पर्धा २०२६-२७ मध्ये विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि संशोधनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली. संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्तूंचे आंतरजाल, संगणकीय सुरक्षितता, संकेतस्थळ व भ्रमणध्वनी अनुप्रयोग विकास तसेच संशोधन लेखन अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्यांना या स्पर्धेत व्यासपीठ मिळाले.
प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या ‘व्हिडिओ फिनिक्स’ ध्वनिचित्रफीत स्पर्धेत सारा मुकादम व रुकया फणसोपकर यांच्या ‘फिशिंग हल्ला’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. सुमया मुकादम व मिफारा मुकादम यांच्या ‘प्रकाशाधारित माहिती प्रसारण’ या प्रकल्पाने द्वितीय, तर सिद्धी पावसकर व कस्तुरी पवार यांच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता संगणक प्रोग्रामरची जागा घेऊ शकते का?’ या प्रकल्पाने तृतीय क्रमांक मिळविला.
द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या ‘कोड फिनिक्स’ संगणकीय प्रणाली विकास स्पर्धेत फरिहा म्हसकर हिने सादर केलेल्या ‘सायबर संरक्षक’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला. ओम विश्वनाथ बाईत व चिनार विजय मयेकर यांच्या ‘गुप्तलेख सुरक्षित भांडार’ या प्रकल्पाला द्वितीय, तर अमृता महादेव देवळे व लावण्या चंद्रशेखर वाळकर यांच्या ‘रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.
तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या ‘डेव्ह फिनिक्स’ वैयक्तिक अनुप्रयोग व संकेतस्थळ विकास प्रकल्प विभागात वरद मंगेश सरदेसाई यांच्या ‘खगोलशास्त्रज्ञाची दिनदर्शिका’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. यश सूर्यकांत पकये यांच्या ‘मृदासंशोधन प्रयोगशाळा व्यवस्थापन प्रणाली’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळविला. रसिक अनंत लिंगायत यांच्या ‘क्यूआर संकेताधारित संशोधन लेख सादरीकरण प्रणाली’ आणि श्रेया बंडबे यांच्या ‘समुद्रप्रवाशांच्या वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्र व्यवस्थापन प्रणाली’ या दोन्ही प्रकल्पांना तृतीय क्रमांक मिळाला.
एम.एस्सी. भाग-१ संगणकशास्त्राच्या ‘रिसर्च रायटिंग फिनिक्स’ संशोधन लेखन स्पर्धेत वेदांत महेश तेंडुलकर व राज विनायक खानविलकर यांच्या ‘स्मार्ट फार्मिंग ३६० : हवामान अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व वस्तूंच्या आंतरजालावर आधारित स्मार्ट शेती प्रणाली’ या संशोधन प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला.
एम.एस्सी. भाग-२ संगणकशास्त्राच्या ‘रिसर्च फिनिक्स’ संशोधन स्पर्धेत वैष्णवी गुरव यांच्या ‘चेहरा, आवाज आणि मजकूराच्या साहाय्याने मानसिक ताणाचे लवकर निदान करणारी बहुमाध्यम भावनाओळख प्रणाली’ या संशोधनाने प्रथम क्रमांक पटकावला. उमैमा हमदरे यांच्या ‘भाषा प्रक्रिया व यंत्र-अध्ययनाच्या साहाय्याने दृष्टी व शारीरिक अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आवाज नियंत्रित सहाय्यक प्रणाली’ या प्रकल्पाला द्वितीय, तर सारा माजगावकर यांच्या ‘स्मार्ट जलव्यवस्थापनासाठी वस्तूंच्या आंतरजाल व यंत्र-अध्ययनाच्या साहाय्याने पाणी वापराचा अंदाजाधारित अभ्यास’ या संशोधनाला तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याबरोबरच नाविन्यपूर्ण विचार, समस्या निराकरण, संशोधनवृत्ती, प्रकल्प सादरीकरण आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या आयोजनासह विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यात परीक्षक कौस्तुभ भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व माहितीविज्ञान विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, माहिती तंत्रज्ञान-संगणकशास्त्र समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, परीक्षक कौस्तुभ भागवत तसेच संगणकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फिनिक्स स्पर्धा २०२६-२७ मधील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि यश हे महाविद्यालयातील तांत्रिक शिक्षण, संशोधनाभिमुख दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनाशक्तीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
फिनिक्स अंतर्गत सॉफ्टवेअर स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
Leave a Comment





