गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगद्याची चिंता कायम; गळतीमुळे वाहनचालकांची कसरत

Gramin Varta
56 Views

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नसल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर हा प्रश्न वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि प्रवासी दाखल होणार असताना बोगद्यामध्ये सुरू असलेल्या गळतीमुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कशेडी बोगद्याचे काम पूर्णत्वास गेले असले तरी पावसाळ्यात दोन्ही बोगद्यांमध्ये छत तसेच भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाझर सुरू आहे. काही ठिकाणी पाण्याचे फवारे उडत असल्याने बोगद्यातील रस्ता सतत ओला आणि निसरडा राहत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने सावधगिरीने चालवावी लागत असून अचानक ब्रेक किंवा वाहन घसरल्यास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही पाण्याचा पाझर सुरूच असल्याने या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने तसेच गळती रोखण्यासाठी करण्यात आलेले कोटिंगचे काम पावसाच्या पाण्यापुढे टिकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता बोगद्याच्या गळतीमागील मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत कशेडी बोगद्यातील गळती आणि निसरड्या रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन बोगद्यातील पाण्याचा पाझर कायमस्वरूपी थांबवण्यासाठी ठोस आणि शास्त्रीय उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.

Total Visitors :
4754737
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *