खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथील शिवनेरी हॉटेलजवळ कारला मागून भरधाव वेगाने धडक देऊन अपघातस्थळी न थांबता पसार झालेल्या क्रेटा चालकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कारचालक दिनेश परशुराम चव्हाण (वय ४७, रा. कटेल, ता. खेड) हे जखमी झाले आहेत.
८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात घडला. दिनेश चव्हाण हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एमएच ०८ बीई ९४६९ घेऊन रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर मोरे फर्निचर येथून वळण घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने जात होते. भरणे नाका येथील शिवनेरी हॉटेलजवळ आले असता, मुंबईच्या दिशेने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कार क्रमांक एमएच ०४ जेबी ५८५० वरील चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता हयगयीने व अतिवेगाने वाहन चालवून चव्हाण यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली.
धडकेमध्ये चव्हाण जखमी झाले. अपघातानंतर क्रेटा चालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी दिनेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये आरोपी दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय २४, रा. नरळेवस्ती खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.
खेडमध्ये कारला मागून धडक देऊन पसार झालेल्या क्रेटा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Leave a Comment



