नागोठणे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी गावच्या हद्दीत, जिंदाल कंपनीसमोर पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून आलेल्या भरधाव बलेनो कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला जाऊन चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून ते वाहनातच अडकून पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचे दरवाजे तोडून व पत्रा कापून अडकलेल्या जखमींना अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दोघांनाही तात्काळ उपचारासाठी नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
सदर अपघात पहाटेच्या वेळी घडल्यामुळे चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून अशा वाहनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




