रायगड – अंजप फाट्यावर भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
4 Views

रायगड: कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे मार्गावरील अंजप फाटा येथे शनिवारी (८ ऑगस्ट) सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात डोंगरपाडा येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

अजित शरद भालचिम असे मृत तरुणाचे नाव असून, या अपघातात त्याची दोन भावंडे गंभीर जखमी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित शरद भालचिम, अक्षय शरद भालचिम आणि कामिनी भरत भालचिम हे तिघे शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास शाईन दुचाकीवरून गावाकडे जात होते. अंजप फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या केटीएम दुचाकीशी जोरदार धडक झाली. या अपघातात तिन्ही जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने कशेळे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, अजितची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी अजित भालचिम याला मृत घोषित केले. अक्षय आणि कामिनी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातातील केटीएमस्वार मुंबई येथील पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, अपघातानंतर तो घटनास्थळावरून निघून गेल्याने कर्जत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. अपघाताची नोंद करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने डोंगरपाडा गावावर शोककळा पसरली असून, तरुणाच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4671918
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *