मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल धोकादायक; कोकणातील प्रवाशांचा जीव टांगणीला

Gramin Varta
147 Views

रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असतानाच महामार्गावरील काही उड्डाणपुलांच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांवर भगदाडे, तडे, भेगा तसेच खड्डे पडल्याचे चित्र समोर आल्याने कोकणात प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काही भागांत रस्ते आणि पूल पूर्ण झाल्याचे दिसत असले तरी पावसाळ्यात या बांधकामांची गुणवत्ता समोर येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विशेषतः उड्डाणपुलांच्या संरचनेवर तडे जाणे अथवा रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डे निर्माण होणे ही बाब गंभीर मानली जात आहे.

पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत पुलांवरील तडे, भेगा आणि खड्डे वेळीच दुरुस्त न केल्यास अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुंबई-गोवा महामार्गावरील काही भागांत काँक्रीट रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते.

दरम्यान, महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले जात असले तरी माणगाव-इंदापूरसह काही महत्त्वाची कामे अद्याप रखडलेली आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी उड्डाणपुलांची तातडीने पाहणी करून बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4671916
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *