मुंबई: भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेट देत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेश सेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेले मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन चंदनवाडी स्मशानभूमीत जाऊन घेतले. मंडळाच्या कार्यकर्त्यांना धीर दिला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेमागे नेमका दोष कोणाचा आहे आणि दुर्घटना कशामुळे घडली, हे चौकशीचा विषय आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील.दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यामागील नेमकी कारणे आणि जबाबदारी निश्चित होईल.
मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी गणेश मंडळे, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महापालिकेने गणेश आगमन मार्गांकडे तातडीने लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्याची भूमिका राहणार असून, जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आवश्यक ती सर्व मदत आणि आर्थिक सहाय्य देण्यात येईल, तसेण त्यांनी वैयक्तिकरित्या 5 लाखाची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली.
ते म्हणाले, गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारे ट्राँली, चाकांची रचना, लोखंडी भाग तसेच त्यातून निर्माण होणारे कंपन याबाबत गणेश मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्व गणेश भक्त आणि मंडळांना माझी विनंती आहे की, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.”
गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची २४ तासांत पाहणी करण्याचे निर्देश
“काल रात्री मी मुंबई महापालिका आयुक्तांशी स्वतः बोललो आहे. मुंबईतील गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची स्थिती तातडीने तपासण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा केली असून, पुढील २४ तासांत गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांवरील रस्त्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.
“महापालिकेने यापूर्वीही विविध बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
गणेश सेवकांना श्रद्धांजली
“ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत आमचे दोन गणेश सेवक आपल्यातून निघून गेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी गणेश सेवक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे शेलार म्हणाले.
दुर्घटनेमुळे देशभरातील गणेश भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. “या दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही व्यक्तीच्या जीवाचे मोल करता येत नाही; प्रत्येक जीव अमूल्य आहे. कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मी येथे आलो आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.




