‘राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला’; राज ठाकरेंची गडकरींसह तटकरेंवर थेट टीका

Gramin Varta
81 Views

रायगड : गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रायगड दौरा केला. महामार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेसह कोकणातील विकासाच्या धोरणावरून सरकार आणि स्थानिक राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि रायगडातील स्थानिक राजकीय नेते सुनील तटकरे यांचा उल्लेख केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदारांना कंत्राटे देण्यात आली, मात्र आवश्यक जमीन संपादन वेळेत न झाल्याने प्रकल्प रखडल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. यापूर्वी आपण नितीन गडकरी यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केली होती, असा दावा करत त्यांनी कंत्राटदार काम सोडून गेल्याच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला. “कंत्राटदार कंटाळून निघून गेले असतील, तर ते कोणाला कंटाळून निघून गेले?” असा सवाल त्यांनी केला.

रस्ते बांधताना सरकारने आवश्यक जमीन संपादित करून देणे अपेक्षित असते. मात्र, जमीन संपादन, कंत्राटे आणि कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे अनेक वर्षे कामे रखडत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. नवीन बांधलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नवीन रस्त्यांचीच अशी अवस्था असेल तर बायपासची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी राज ठाकरे यांनी कोकणातील विकासाच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. विकासाच्या नावाखाली जमिनींच्या व्यवहारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रायगड परिसरात प्रस्तावित असलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’चा संदर्भ देत येथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, जागतिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसारखे प्रकल्प उभे राहणार असल्याचे सांगितले जाते; मात्र या विकासासाठी स्थानिक तरुणांना तयार केले जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“शहरे उभी करायची, रस्त्यांची वाट लावायची आणि जमिनी विकण्याचा धंदा सुरू ठेवायचा, असा विकास नको,” अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. विकासाला आपला विरोध नसून कोकणाचा विकास स्थानिकांच्या हिताचा आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक राजकारणावर टीका करताना राज ठाकरे यांनी आमदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांची माहिती आधीपासून असल्याचा आरोप केला. त्यामुळे संबंधित भागातील जमिनींचे व्यवहार होत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलीचा, तसेच ठाकूर कुटुंबाचा उल्लेख करत स्थानिक राजकारणातील कुटुंबकेंद्री प्रभावावरही निशाणा साधला.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रस्त्यांची गुणवत्ता, जमीन संपादन आणि रायगडातील प्रस्तावित विकास प्रकल्प या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी सरकारसह स्थानिक राजकीय व्यवस्थेला लक्ष्य केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांवरून कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Total Visitors :
4668395
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *