फिरोज बाबा प्रकरणात नवा ट्विस्ट; विनायक राऊतांच्या सुनेच्या तक्रारीवरून सिंधुदुर्गातील पाच जणांना ठाणे पोलिसांचे समजपत्र

Gramin Varta
519 Views

सिंधुदुर्ग :  जिल्ह्यातील चर्चिल्या जाणाऱ्या ‘फिरोज बाबा’ प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाई गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर तक्रारीच्या अनुषंगाने, ठाणे शहरातील कापूरबावडी पोलिसांनी सिंधुदुर्गातील पाच जणांना चौकशीसाठी समजपत्र बजावले आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठाणे पोलिसांनी बजावलेल्या समजपत्रानुसार, चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सावंतवाडीचे ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ, कोलगावचे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, अमित नाईक, बाळा पेडणेकर आणि संजय परब यांचा समावेश आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १७९ अन्वये हे लेखी आदेश बजावण्यात आले असून, या सर्वांना तपासात सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत सासरच्या मंडळींवर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. संतती प्राप्तीसाठी सासरच्या लोकांनी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून अमानुष छळ केला असून, वारंवार गोमूत्र पिण्यास भाग पाडले आणि विविध अघोरी कृत्ये करायला लावली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, पती शारीरिक संबंधांसाठी सक्षम नसतानाही ही बाब लपवून लग्न लावून दिले, लग्नानंतरही मारहाण आणि मानसिक छळ केला, तसेच मुंबईत मोठा बंगला असल्याचे सांगून लग्नानंतर झोपडपट्टीत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपली खाजगी नोकरी सोडायला लावून आर्थिक खच्चीकरण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणावरून आधीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आणि ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता थेट चौकशीसाठी समजपत्र बजावल्याने या वादाला नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827958
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *