कोकणवासीयांनो सावधान! मुंबई-गोवा महामार्गावर २० ‘ब्लॅक स्पॉट’; रायगडमध्ये सर्वाधिक धोकादायक ठिकाणे

Gramin Varta
196 Views

मुंबई: गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणवासीय आपल्या गावी परततात. रेल्वेसोबतच रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक वाढण्याची शक्यता असताना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर अपघातांचा धोका असलेली तब्बल २० ठिकाणे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक ठिकाणांचा समावेश आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी या मार्गावरील अपघातांचे सत्र अद्याप पूर्णपणे थांबलेले नाही. गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग पोलिस आणि राज्य पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून धोकादायक ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते पोलादपूर या सुमारे १५० किलोमीटरच्या टप्प्यात सर्वाधिक १७ अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. नागोठणे जवळील सुकेळी खिंड, गोरेगाव तालुक्यातील रेपोली आणि लोणेरे, तळेगाव पेट्रोल पंपाच्या दोन्ही बाजू, माणगाव तालुक्यातील कशेणे, महाड तालुक्यातील टेमपाले, टेमपाले ते लाखपाले, पहेल, तसेच पेण तालुक्यातील शेठफळ, त्रणकोप, रामवाडी आणि वाशीफाटा या ठिकाणांचा त्यात समावेश आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले आणि डोल्वी ही ठिकाणेही अपघाताच्या दृष्टीने धोकादायक मानण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-भोस्ते आणि हातखंबा या दोन ठिकाणांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय कोकणाकडे जाणाऱ्या पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटातील एका नव्या ठिकाणाचाही अपघातप्रवण क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील देवरुख-दाभोळे परिसरातही विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-जाणवली परिसरातील रस्त्यावरही वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी लक्षात घेता या धोकादायक ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा, पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण पथके तैनात केली जाण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी या ठिकाणी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, ब्लॅक स्पॉटवर केवळ गणेशोत्सवाच्या काळात तात्पुरत्या उपाययोजना न करता या ठिकाणांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात आणि मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक आणि कोकणवासीयांकडून जोर धरत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी निघण्यापूर्वी वाहनचालकांनी मार्गावरील धोकादायक ठिकाणांची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.

Total Visitors :
4712243
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *