आंबोली : वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या निपाणी येथील एका डॉक्टरचा आंबोलीतील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी घडली. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव असून, उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसह आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते महादेवगड पॉईंट परिसरात असताना लघुशंकेसाठी सुरक्षेच्या रेलिंगच्या पलीकडे गेले. याचवेळी अचानक त्यांचा तोल जाऊन ते सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले.
या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या तेथील मक्याची कणसे विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्याने डॉक्टर दरीत कोसळताना पाहिले. त्याने तत्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच आंबोलीतील ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण करण्यात आले. पोलिस आणि रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम सुरू केली.
मात्र, परिसरातील संततधार पाऊस, दाट धुके, निसरडा कडा आणि वाढता अंधार यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास शोधमोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली.
रेस्क्यू टीमच्या प्राथमिक अंदाजानुसार, डॉ. सय्यद हे पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे २०० फूट पुढील जंगल परिसरात कोसळले असावेत. अपघाताच्या ठिकाणी त्यांचा मोबाईल वरच राहिल्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणेही शक्य झाले नाही.
प्रतिसादात्मक हवामान आणि अंधारामुळे थांबविण्यात आलेली शोधमोहीम बुधवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे आंबोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘क्षणात सर्व काही संपलं!’ वर्षा पर्यटनाला आलेले डॉक्टर आंबोलीत ४०० फूट दरीत कोसळले; पाऊस, धुक्यामुळे रात्रभर शोधमोहीम स्थगित
Leave a Comment







