रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगत खेडशी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील नव्याने बांधलेल्या काँक्रीट रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तब्बल सात फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या अजगरामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, सतर्क वाहनचालकांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला.
माहितीनुसार, महालक्ष्मी मंदिरासमोरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून या मार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षणीय वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याच्या मध्यभागी आलेला अजगर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकला असता. गुळगुळीत काँक्रीट रस्त्यावर अजगराला पुढे सरकणे कठीण जात असल्याने तो बराच वेळ रस्त्यावरच अडकून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, काही सतर्क दुचाकीस्वारांनी वेळीच वाहने थांबवत समोरून येणाऱ्या वाहनांना इशारा दिला. त्यामुळे वाहनचालकांनी संयम राखत वेग कमी केला आणि अजगराला सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा अपघाताची घटना घडली नाही.
वन्यजीव अधिवासालगतच्या भागात अशा घटना अधूनमधून घडत असल्याने वाहनचालकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी : मध्यरात्री खेडशीत महालक्ष्मी मंदिरासमोर सात फूट लांबीचा अजगर; दुचाकीस्वारांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
Leave a Comment






