कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक १४ तास विस्कळीत; मार्गिका पूर्ववत

Gramin Varta
126 Views

महाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी आणि चोळई गावाजवळ हॉटेल अन्नपूर्णासमोरील डोंगरावरून मंगळवारी रात्री दरड कोसळल्याने एक मार्गिका तब्बल १४ तास बंद होती. मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी मार्गिका पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. रात्रीच्या वेळी अधूनमधून दरड कोसळण्याचे प्रकार सुरू असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला होता. कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि पोलादपूर पोलिसांनी गोव्याकडे जाणारी मार्गिका दुहेरी करून मुंबईकडे जाणारी वाहने वळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

महाड औद्योगिक वसाहतीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून वाहतुकीचे नियोजन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम हाती घेतले; मात्र सततच्या पावसाने या कामात मोठा अडथळा निर्माण केला होता. अखेर बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रस्ता मोकळा करण्यात यश आले आणि १४ तासांनंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डोंगर उभे कापल्यामुळे पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Total Visitors :
4576134
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *