कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थंडावला; रो-रो कार वाहतूक सेवा यंदा अखेर गुंडाळली

Gramin Varta
162 Views

बेलापूर: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी, या उद्देशाने कोकण रेल्वेने मागील वर्षी अतिशय उत्साहात सुरू केलेली कार रो-रो सेवा प्रायोगिक प्रकल्प म्हणून यंदा पूर्णपणे गुंडाळण्यात आली आहे. या सेवेला वाहनचालक आणि प्रवाशांकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आगामी गणेशोत्सवात ही सेवा कोण-कोणत्याही स्वरूपात उपलब्ध असणार नाही. कोकणातील चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोलाड, नांदगाव रोड आणि गोवा या मार्गांवर गेल्या वर्षी २३ ऑगस्टपासून ही रो-रो कार वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती.

२१ जुलैपासून या सेवेसाठी अधिकृत आरक्षण प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, एसटी बसेस आणि खासगी वाहनांचे बुकिंग फुल्ल असतानाही कोकण रेल्वेच्या या कार रो-रो सेवेसाठी संपूर्ण कालावधीत अवघ्या पाच चारचाकी वाहनांचेच बुकिंग नोंदवले गेले होते. यंदाच्या गणेशोत्सवासाठी देखील या सेवेबाबत नागरिकांकडून कोणतीही विचारणा किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेणे भाग पडले. कार रो-रो सेवेला गतवर्षी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि यंदाच्या वर्षी देखील याबाबत कोणतीही विचारणा झाली नसल्याने ही सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा यंदाचा गणेशोत्सव प्रवास त्रासदायक ठरणार हे स्पष्ट झाले आहे.

Total Visitors :
4693429
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *