महाड : महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेचा तब्बल १८ वर्षे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करून तिच्या इच्छेविरुद्ध तब्बल १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप पतीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह ९ ऑक्टोबर २००८ रोजी आरोपीशी झाला होता. विवाहानंतर आरोपीने पत्नीला माहेरून काहीच आणले नसल्याचे वारंवार सुनावत तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तसेच ती नोकरी करत असल्याने तिच्याकडून सतत पैशांची मागणी करण्यात आली. घरखर्चासह मुलांच्या शिक्षणाचा खर्चही जबरदस्तीने तिच्याकडूनच उचलून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीचे विवाहबाह्य संबंध असून त्यावरून पत्नीला सातत्याने त्रास दिला जात होता. चाकूचा धाक दाखवून घरातील भांडी, झाडू, कंबरेचा बेल्ट तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर तिचे डोके भिंतीवर आपटून गळा दाबण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप आहे.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे २००९ ते २०२२ या कालावधीत विविध कारणे सांगत दबाव टाकून पत्नीच्या संमतीशिवाय तब्बल १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या आरोपांमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणी महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ८५, ८९, ३५१(२), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून त्याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
‘मानवतेला काळिमा!’ विवाहितेचा १८ वर्षे छळ; इच्छेविरुद्ध १० वेळा गर्भपात केल्याचा आरोप
Leave a Comment






