देवरूख : देवरूख-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे भरधाव अनियंत्रित ट्रकच्या धडकेत ३३ वर्षीय प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बेकायदा चिरे वाहतुकीमुळे एका निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनेच्या निष्पक्ष व सखोल चौकशीसाठी तात्काळ दहा कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक तैनात केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या थेट देखरेखीखाली प्रत्येक बाजूची बारकाईने तपासणी सुरू आहे.
सिमेचीवाडीतील या भीषण अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आंबवली व परिसरातील शेकडो संतप्त ग्रामस्थांनी देवरूख पोलीस ठाण्यावर थेट धडक दिली. केवळ ट्रक चालकावरच नव्हे, तर बेकायदेशीर चिरे वाहतूक करणाऱ्या मूळ ट्रक मालकावरही कठोर कलमान्वये गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक आणि ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यामुळे शहरात काही काळ वातावरण कमालीचे तापून तणाव निर्माण झाला होता.
घटनेची संवेदनशीलता लक्षात घेत देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी तातडीने कारवाई करत सुरुवातीला ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यानंतरच्या चौकशीत संबंधित ट्रकच्या कागदपत्रांची वैधता संपुष्टात आल्याचे उघडकीस येताच, पोलिसांनी कारवाईचा फास आवळत गुरुवारी संध्याकाळी ट्रक मालकावरही खटला दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आता विशेष पथकामार्फत या संपूर्ण प्रकरणाची कडक चौकशी केली जात आहे.




