लांजा/अरबाज नेवरेकर : तालुक्यातील विवली गावचे सुपुत्र शाहिर विकास लांबोरे यांनी मुंबईच्या रंगमंचावर नुकताच सादर केलेल्या ‘शक्तितुरा’ या पारंपरिक लोककला कार्यक्रमाची अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दखल घेतली. या कार्यक्रमातून करण्यात येणारे समाजप्रबोधन आणि कोकणच्या पारंपरिक लोककलेचा बाज मुंढे यांना विशेष भावला.
मुंबईच्या रंगमंचावर ‘शक्तितुरा’ कार्यक्रम सादर करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर गीत सादर करण्यात आले होते. हे गीत आयुक्त मुंढे यांच्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, केवळ गीतापेक्षा ‘शक्तितुरा’ या लोककलेच्या माध्यमातून होणारे समाजप्रबोधन त्यांना अधिक भावले.
या कार्यक्रमाची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाहिरी विकास लांबोरे यांच्याशी संपर्क साधून भेटण्याचे निश्चित केले. त्यानुसार नुकतीच दोघांची भेट झाली. यावेळी ‘शक्तितुरा’ या लोककलेसह तिच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याबाबत मनमोकळी चर्चा झाली.
लोककलेच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश पोहोचविण्याचे काम सातत्याने सुरू ठेवावे, तसेच आपल्या पारंपरिक लोककलेचे जतन करावे, अशी अपेक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली. लांबोरे यांच्या ‘शक्तितुरा’च्या माध्यमातून सामाजिक विषय मांडण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
कोकणच्या मातीत रुजलेल्या ‘शक्तितुरा’ या पारंपरिक लोककलेची मुंबईच्या रंगमंचावर दखल घेतली जाणे आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवर्जून भेट घेऊन कलाकाराशी चर्चा करणे, ही विवलीसह लांजा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या भेटीमुळे कोकणातील पारंपरिक लोककलेला व्यापक व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने नवी ऊर्जा मिळाली आहे.
लांजा:विवलीच्या विकास लांबोरे यांच्या ‘शक्तितुरा’ची आयुक्त तुकाराम मुंढेंकडून दखल
Leave a Comment






