लांजा शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षलागवड; इशारा देऊनही खड्डे न बुजवल्याने राष्ट्रवादी (श.प.)पक्ष आक्रमक

Gramin Varta
209 Views

लांजा /अरबाज नेवरेकर:-लांजा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आज १५ ऑगस्ट रोजी अनोख्या पद्धतीने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधले.

शहरातील खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करताना “कोट्यवधींचा निधी गेला कुठे?” आणि “खड्डेमय रस्त्याला जबाबदार कोण?” असे सवाल करणारे फलक हातात घेण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे यांनी १० ऑगस्ट रोजी लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे १५ ऑगस्टपर्यंत बुजविण्याची मागणी केली होती. तसेच, दिलेल्या मुदतीत खड्डे न बुजवल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

मात्र, १५ ऑगस्टपर्यंत खड्डे न बुजवल्याने दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरविण्यात आला. शहरातील खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी हातात फलक घेऊन रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करून आणि सवाल करणारे फलक हातात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लांजा शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष दाजी गडहिरे, चंद्रशेखर (बाबा) धावणे, शिवसैनिक सागर वायंगणकर,मोहन तोडकरी, श्री.गुरव, सामाजिक कार्यकर्ते नौशाद नेवरेकर, आदी कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

Total Visitors :
4704364
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *