ईद-ए-मिलाद शांततेत साजरा करण्याचे आवाहन; लांजा पोलिसांची मुस्लिम समाजासोबत बैठक

Gramin Varta
66 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी लांजा पोलीस ठाण्यात  मुस्लिम समाजातील पदाधिकारी व प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सणाच्या आयोजनासंदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

येत्या २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद साजरा होणार आहे. सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका तसेच धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीचा मार्ग व वेळ निश्चित करताना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सांगितले.

सणाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांना अथवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशांना बळी पडू नये. सोशल मीडियावर चुकीची किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती आढळल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांनी शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बगळे यांनी केले.

यावेळी मुस्लिम समाजातील उपस्थित पदाधिकारी व प्रतिनिधींनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ईद-ए-मिलादचा सण शांततेत, शिस्तीत आणि सर्वधर्मीय सलोखा जपत साजरा करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

बैठकीस तालुक्यातील मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच विविध मोहल्ला समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

Total Visitors :
4668797
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *