लांजा / अंकुश पोटले : तालुक्यातील शाळा कोंडगे क्रमांक पाच पाळटोख धनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने अखेर दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली आहे. पंचायत समिती लांजाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने शाळेची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय, इमारतीची धोकादायक स्थिती आणि ग्रामस्थांच्या मागण्यांची सखोल तपासणी केली.
या पाहणी मोहिमेदरम्यान कनिष्ठ अभियंता आशिष राठोड, शिक्षण गट अधिकारी विनोद सावंत, केंद्रप्रमुख सुधीर जाधव तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी देखील घटनास्थळी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सविस्तर मांडल्या. यावेळी सचिन बेर्डे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, नवीन शाळा इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली.
चौकशी समितीने घटनास्थळी पाहणी करून सर्व बाबींची नोंद घेतली असून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. हा सविस्तर चौकशी अहवाल लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रत्यक्ष पाहणीचे स्वागत केले असून युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला अखेर घटनास्थळी यावे लागले, अशी भावना व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींमुळे आता विद्यार्थ्यांसाठी लवकरच एक सुरक्षित आणि सुसज्ज शाळा उभी राहील, अशी तीव्र आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





