संगमेश्वर : देवळे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नागरिक, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि आपल्या लेखणीतून गावच्या इतिहास-संस्कृतीला उजाळा देणारे श्री. शरद अनंत साडविलकर यांचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी काही तासांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देवळे गावावर शोककळा पसरली असून, सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. श्री. साडविलकर हे देवळे गावातील प्रत्येकाच्या परिचयाचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणे, आदराने संवाद साधणे आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता.
लेखनाची विलक्षण आवड असलेल्या त्यांनी सोशल मीडिया व फेसबुकच्या माध्यमातून अनेक ब्लॉग लिहून देवळे गावातील विविध मंदिरे, प्राचीन वास्तू, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक संदर्भ आणि गावच्या वैभवशाली परंपरेतील अनेक अपरिचित पैलू सर्वांसमोर आणले. त्यांच्या माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी लेखनाने देवळे गावच्या इतिहासाची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेत बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यांनी कुटुंबाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते.
निवृत्तीनंतर काही दिवस गावात तर काही दिवस मुंबईत असा त्यांचा दिनक्रम होता, मात्र गावाशी असलेले त्यांचे नाते आणि जिव्हाळा त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवला. देवळे ग्रामविकास मंडळाच्या लेखन कार्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. गावाच्या विकासाबरोबरच गावचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने देवळे गावाने एक आपुलकीचा माणूस, अभ्यासू लेखक आणि गावच्या इतिहास-संस्कृतीचा जागर करणारा संवेदनशील व्यक्ती गमावला असून, त्यांच्या लेखणीची उणीव आणि प्रेमळ स्वभावाच्या आठवणी कायम ग्रामस्थांच्या मनात राहतील. समस्त देवळे ग्रामस्थ आणि देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्यावतीने त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येत आहे.






