डेरवण मार्गावर खड्ड्यांची चाळण; डांबरीकरणाऐवजी जांभ्याची खडी-मातीची मलमपट्टी!

Gramin Varta
78 Views

सावर्डे / विनायक सावंत : चिपळूण तालुक्यातील महत्त्वाच्या डेरवण मार्गाची सध्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. जागतिक दर्जाचे वालावलकर रुग्णालय, कोकणातील पहिले विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंग्लिश मीडियम शाळांसह अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक व आरोग्य संस्था याच मार्गावर असल्याने दिवसभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार आवाज उठूनही कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये जांभ्याची (चिऱ्याची) खडी आणि माती टाकून वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे. पावसाळ्यात ही खडी आणि माती काही तासांतच वाहून जाते आणि पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे उघडे पडतात. त्यामुळे सार्वजनिक निधी खर्च करून दुरुस्ती केली जाते की केवळ खड्डे बुजवल्याचे दाखवले जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्ड्यांमधून वाहने काढताना वाहनांचे नुकसान होत असून, अचानक ब्रेक लावावे लागत असल्यानेही अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

या मार्गावर रुग्णवाहिकांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या किंवा रुग्णालयातून परतणाऱ्या रुग्णवाहिकांना खड्ड्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे महत्त्वाचे असताना खराब रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच रुग्णांच्या त्रासातही भर पडत आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनाही दररोज याच खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.

एकीकडे मोठमोठ्या संस्था, रुग्णालये आणि शैक्षणिक केंद्रांमुळे हा मार्ग महत्त्वाचा; मात्र दुसरीकडे रस्त्याची अवस्था मात्र गावातील एखाद्या अंतर्गत रस्त्यासारखी! अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता तात्पुरत्या खडी-मातीच्या मलमपट्टीऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना आणि गतिरोधक बसवावेत, अशीही मागणी करण्यात येत आहे.

खड्डे बुजवायचे की फक्त खड्ड्यांवर माती टाकून जबाबदारी झटकायची? असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात असून, एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Total Visitors :
4680529
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *