चिपळूणमध्ये पाचवर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; रुग्णालयात तणाव, पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

Gramin Varta
326 Views

चिपळूण : शहरातील मार्कंडी परिसरातील एका बालरुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या पाच वर्षीय बालकाचा गुरुवारी रात्री उशिरा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रियांश नवनीत नरळकर असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उपचारात हलगर्जीपणा झाल्याची चर्चा शहरात पसरताच अनेक नागरिक, नगरसेवक, पत्रकार तसेच वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णालयात दाखल झाले, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परशुराम नगर येथे राहणारे नवनीत नरळकर व त्यांची पत्नी साक्षी हे त्यांचा 5 वर्षीय मुलगा रियांश याला गुरुवारी उपचारासाठी मार्कंडी येथील बालरुग्णालयात घेऊन गेले होते. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर प्रकृती सुधारल्याने त्याला घरी नेण्यात आले होते, मात्र प्रकृती बिघडल्यास पुन्हा रुग्णालयात आणण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दुपारी रियांशला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रिक्षाने दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले, तेथे उपचार केल्यानंतर प्रकृती स्थिर वाटल्याने त्याला पुन्हा घरी आणण्यात आले.

मात्र रात्री तो घरी खेळत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने पुन्हा मार्कंडी येथील बालरुग्णालयात नेण्यात आले, जिथे तपासणीनंतर इन्फेक्शनमुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली.

रियांशच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नगरसेवक साजिद सरगुरो, नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रुग्णालयात दाखल झाले. वाढता तणाव पाहता चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तर आयएमए संघटनेचे पदाधिकारी डॉक्टरही तिथे पोहोचले व त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. एकुलता एक मुलगा गमावल्याने नरळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रियांशच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.

- Advertisement -

या प्रकरणी तेजस नरळकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा रियांशचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आणि शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देऊन शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. रियांशच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकी असा परिवार असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल व व्हिसेराचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Total Visitors :
4661812
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *