देवरुखच्या विलास रहाटे यांनी ‘नाबार्ड’ कार्यालयात साकारलेली रांगोळी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gramin Varta
121 Views

देवरुख : देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील नाबार्ड (NABARD- National Bank for Agriculture & Rural Development) अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात “राष्ट्रीय हातमाग दिनाच्या(National Handloom Day)” निमित्ताने साकारलेली रांगोळी दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक वर्षी भारतात “राष्ट्रीय हातमाग दिन” ७ ऑगस्ट रोजी विविध उपक्रमाने साजरा केला जातो.

७ ऑगस्ट, १९०५ रोजी कोलकाता येथील टाऊन हॉलमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात अधिकृतपणे स्वदेशी चळवळीचा प्रारंभ झाला होता. याच घटनेची आठवण म्हणून भारत सरकारने ७ ऑगस्ट, २०१५ रोजी पहिला ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ घोषित केला. या पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे झाले होते. देशातील हातमाग विणकर समुदायाचा सन्मान करणे व त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या दिनामागे आहे. हातमाग विणकारांचे सबलीकरण आणि “माय हॅन्डलूम… माय प्राईड(MY HANDLOOM…. MY PRIDE)” ही संकल्पना यावर्षीच्या राष्ट्रीय हातमाग दिनाची आहे.

सध्या नाबार्डचे प्रमुख कार्यालय बांद्रा कुर्ला संकुल येथे श्री. विलास विजय रहाटे यांनी साकारलेली रांगोळी रसिक प्रेक्षकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. श्री. विलास रहाटे यांनी नाबार्डसाठी यावेळी तिसऱ्या वेळी ही रांगोळी साकारली आहे. यापूर्वी दोन वेळा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सलग दोन वर्ष रांगोळ्या साकारल्या होत्या. यावर्षीच्या रांगोळीमध्ये श्री. विलास रहाटे यांनी पारंपारिक हातमागावर वस्त्र विणणारी स्त्री, जिने हातमागावर तयार झालेली आकर्षक नक्षीकाम असणारी साडी परिधान केली आहे. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हातमाग प्रदर्शनासाठी येणारे मान्यवर, कलाकार व हातमाग प्रेमी नागरिकांकडून श्री. विलास रहाटे यांच्या आकर्षक रांगोळीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4660491
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *