गुणवंत विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण; वाशी तर्फे संगमेश्वरच्या सरपंच तन्वी गानू यांची अनोखी मानवंदना

Gramin Varta
83 Views

संगमेश्वर / योगेश चव्हाण  : राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी चढाओढ पाहायला मिळते. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीने याला अपवाद ठरत सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यांचा अनोखा संगम घडवून आणला. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. तन्वी महेंद्र गानू यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थी साहिल रवींद्र सनगरे याच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून आगळीवेगळी मानवंदना दिली.

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साहिल सनगरे याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे साहिलने कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवत गावात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चित्रकलेतही त्याला विशेष गती आहे. साहिलचे वडील रवींद्र सनगरे हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते. त्यांचे ३ ऑगस्ट रोजी निधन झाले. आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबातील गुणवंत मुलाच्या हस्ते ध्वजारोहण करून सरपंच तन्वी गानू यांनी दिवंगत रवींद्र सनगरे यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली.

सरपंचपदाची धुरा स्वीकारल्यापासून राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वजारोहणाचा मान केवळ पदाधिकाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता गावातील ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सहकारी सदस्यांना देण्याची परंपरा सरपंच गानू यांनी जपली आहे. यंदाही १३ आणि १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्या सौ. पूर्वा मेस्त्री आणि उज्ज्वला महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यापूर्वी उपसरपंच रमण जाधव, ज्येष्ठ नागरिक केशव सावंत आणि पाणीपुरवठा कर्मचारी अरविंद रेके यांनाही ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे. सहकाऱ्यांना आणि गावातील विविध घटकांना सन्मानाची संधी देण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सरपंच तन्वी गानू आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्याने केंद्रप्रमुख म्हणून रुजू झाल्याबद्दल सतीश नेवरेकर यांचा सरपंच गानू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या साहिल सनगरे याचाही विशेष गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपसरपंच रमण जाधव, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कामेरकर, पल्लवी करंडे, अनुष्का सुतार, पूर्वा मेस्त्री, उज्ज्वला महाडिक, केंद्रप्रमुख सतीश नेवरेकर, मुख्याध्यापक सुनील गोठणकर, ग्रामपंचायत विकास अधिकारी सौ. नियती चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4704024
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *