खरकटे फेकल्याचा जाब विचारणे पडले महागात; उरणमध्ये स्थानिक कुटुंबावर शस्त्रांनी हल्ला, १३ जण अटकेत

Gramin Varta
3 Views

उरण : अंगावर खाद्यपदार्थांचे खरकटे फेकल्याबाबत जाब विचारल्याच्या कारणातून द्रोणागिरी नोडमध्ये एका स्थानिक कुटुंबावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. घातक शस्त्रांनी मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच दुचाकीची तोडफोड केल्याप्रकरणी उरण पोलिसांनी १३ संशयितांना शुक्रवारी अटक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० येथील निर्मला हाइट्स इमारतीसमोरील रस्त्यावरून रुपेश भोईर (३८), त्यांची पत्नी रविना (३२) आणि सात वर्षांची मुलगी रुही हे रात्रीच्या सुमारास स्कुटीवरून जात होते. त्यावेळी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून त्यांच्या अंगावर खरकटे फेकण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर वाद वाढला आणि काही जणांनी एकत्र येत भोईर कुटुंबावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हल्लेखोरांनी लोखंडी रॉडसह अन्य घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप असून, कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही पोलिसांकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या स्कुटीची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या घटनेप्रकरणी रुपेश भोईर यांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदिश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कारवाई करत गुड्डू राणा प्रताप सिंह (२५), सचिन रणधीर सिंह (२३), संदीप विजय सिंह (३०), धर्मेंद्र यादव (२५), पदुम श्रीराज नारायण पांडे (२३), राम केवल राणा (२०), चंद्रप्रकाश दिनानाथ यादव (१९), केशरीलाल कृपाराम राणा (२५), संतोष ब्रीजलाल यादव (२६), राजेश रामदेव वर्मा (२५), ब्रिजेश रामसुरत आर्या (२५), बबलू चौहान (२६) आणि भुरा चौहान (२५) अशा १३ जणांना ताब्यात घेत अटक केली.

या घटनेमुळे द्रोणागिरी नोड परिसरात स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रोजगाराच्या निमित्ताने परिसरात वास्तव्यास असलेल्या काही परप्रांतीयांकडून स्थानिकांशी वाद किंवा हल्ल्याच्या घटना घडत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, सदर प्रकरणातील नेमकी घटना, हल्ल्यामागील कारणे आणि आरोपींची भूमिका याबाबतचा तपास उरण पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, एकाच प्रकरणात १३ जणांवर झालेल्या कारवाईमुळे पोलिसांच्या भूमिकेकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4839505
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *