खेड : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मोरवंडे गावाजवळ भाजी वाहतूक करणारा एक टेम्पो तब्बल ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने चालक आणि त्याच्यासोबत असलेला क्लिनर सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
कराड येथून दापोलीच्या दिशेने भाजी घेऊन जाणारा हा टेम्पो रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मोरवंडे गावाजवळ आला असता अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो महामार्गालगत असलेल्या सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. या अपघातात गाडीमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली, तरी टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आतील सर्व भाजीपाला खराब झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेची माहिती समजताच मोरवंडे परिसरात काही काळ नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने वाढणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे या मार्गावरील रस्ते सुरक्षेचा आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.





