मित्राच्या वाढदिवसाचा आनंद ठरला अखेरचा; सरप्राईजसाठी निघाले अन् भीषण अपघातात दोन अल्पवयीन मित्रांनी गमावला जीव

Gramin Varta
627 Views

नागपूर : मित्राचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी सरप्राईज देण्याच्या आनंदात तीन अल्पवयीन मित्र पहाटे कारमधून घराबाहेर पडले; मात्र काही वेळातच त्यांच्या आनंदावर काळाने घाला घातला. पावनगाव ते भरतवाडा वाय-पॉइंट मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. या हृदयद्रावक घटनेने नागपूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर आनंद बेहार (१७), भौमिक अमोल लारोकर (१६) आणि सागर संजय मेलवाणी (१७) हे तिघे मित्र मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पहाटे कारमधून बाहेर पडले होते. वाढदिवसासाठी मित्र येण्यास काही वेळ असल्याने तिघेही कारमधून फेरफटका मारत होते. काही क्षणांपूर्वी सुरू असलेला हा आनंदाचा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती.

पहाटे साडेपाचच्या सुमारास पावनगावहून भरतवाडा वाय-पॉइंटच्या दिशेने कार जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची तीव्रता पाहता कारचा वेग अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

या भीषण अपघातात भौमिक अमोल लारोकर आणि सागर संजय मेलवाणी यांचा गंभीर दुखापतींमुळे जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर आनंद बेहार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने तारांगण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कळमना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कारचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कसे सुटले आणि ट्रक कोणत्या परिस्थितीत रस्त्यावर उभा होता, यासह अपघातामागील अन्य कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

मित्राच्या वाढदिवसासाठी घराबाहेर पडलेल्या तीन जिवलग मित्रांपैकी दोघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या दिवशी वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याचे स्वप्न होते, त्याच दिवशी दोन कुटुंबांवर आपल्या लाडक्या मुलांना गमावण्याची वेळ आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitors :
4696669
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *