पालीत घरासमोरून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
190 Views

रत्नागिरी : तालुक्यातील पाली घडशीवाडी येथे घरासमोर पार्क करून ठेवलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान पाली, घडशीवाडी येथील चंद्रकांत घडशी यांच्या सुमित्रा चाळीसमोरील परिसरात घडली. फिर्यादी सचिन शिवाजी गोंधळी (वय २६, व्यवसाय—ड्रायव्हर, रा. पाली, घडशीवाडी) यांनी त्यांची मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल घरासमोर उभी केली होती.

सकाळी मोटारसायकल जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी परिसरात तसेच आजूबाजूच्या ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, मोटारसायकलचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

चोरीस गेलेल्या मोटारसायकलची किंमत सुमारे २३ हजार रुपये असून ती हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस ११० सीसी, ग्रे-ब्लॅक रंगाची आहे. मोटारसायकलचा क्रमांक एमएच ०८ एव्ही ४२९२ असा आहे.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री ९.०२ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या चोरीप्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

Total Visitors :
4745459
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *