लेकींसाठी आयुष्य झिजवलं… बाप शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहत राहिला पण ५१०० रुपये पाठवून म्हणाल्या,व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा!

Gramin Varta
844 Views

दिल्ली : आयुष्यभर कष्ट करून तीन मुलींना शिकवलं, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. मात्र वृद्धापकाळात त्याच वडिलांना एकटेपणाचा सामना करत वृद्धाश्रमात राहावं लागलं आणि अखेर मुलींची शेवटची भेट होण्याची आस मनातच ठेवून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर घडलेली घटना कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणारी आहे.

महाराष्ट्रात कापड व्यवसाय करणारे शिवचरण गुप्ता यांना व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर ते पत्नी मीना यांच्यासह हरियाणातील सोनीपत येथे राहू लागले. सुमारे दीड वर्षांपूर्वी दोघांनी वृद्धाश्रमाचा आधार घेतला. काही महिन्यांपूर्वी पत्नीचं निधन झाल्यानंतर शिवचरण गुप्ता पूर्णपणे एकटे पडले. वाढत्या आजारपणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती.

वृद्धाश्रमाच्या संचालकांनी तब्येत गंभीर असल्याची माहिती तीनही मुलींना जवळपास २० दिवसांपूर्वी दिली होती. मात्र प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणं सांगत त्यांनी येणं टाळलं. मृत्यूपूर्वी एकदा तरी आपल्या लेकींना भेटावं, अशी शिवचरण गुप्ता यांची शेवटची इच्छा होती. पण ती इच्छा अपुरीच राहिली.

शिवचरण गुप्ता यांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने पुन्हा मुलींशी संपर्क साधला. मृतदेह सुरक्षित ठेवण्याची तयारी असल्याचं सांगून अंत्यसंस्कारासाठी येणार का, अशी विचारणा करण्यात आली. मात्र तिघींनीही वेळ नसल्याचं कारण देत येण्यास नकार दिला.

यानंतर नेपाळमध्ये शिक्षिका असलेल्या मोठ्या मुलीने ऑनलाइन ५,१०० रुपये पाठवले आणि “वडिलांवर नीट अंत्यसंस्कार करा, आम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवा,” अशी विनंती केली. अंत्यसंस्कारानंतरचे व्हिडिओही पाठवण्यास सांगितले.

शिवचरण गुप्ता यांच्या तिन्ही मुली सुशिक्षित आहेत. मोठी मुलगी नेपाळमध्ये शिक्षिका आहे, दुसरी मुलगी उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहते, तर धाकटी मुलगी मुंबईत वास्तव्यास आहे. मात्र तिघींनीही वडिलांच्या अखेरच्या प्रवासाला उपस्थित राहणं टाळलं.

सुरुवातीला मुलींनी अस्थी जपून ठेवण्यास सांगितलं. मात्र अस्थी विसर्जनासाठी येणार का, अशी विचारणा केल्यानंतरही त्यांनी नकार दिला. “आता बाबा नाहीत, येऊन काय करायचं? तुम्हीच गंगेत अस्थी विसर्जित करा,” असा संदेश त्यांनी वृद्धाश्रमाला दिला.

अखेरीस शिवचरण गुप्ता यांच्या अंत्यसंस्कारापासून अस्थी विसर्जनापर्यंतची संपूर्ण जबाबदारी वृद्धाश्रम प्रशासनानेच पार पाडली. आयुष्यभर लेकींसाठी जगलेल्या एका वडिलांचा शेवटचा प्रवास मात्र आपल्या लेकरांशिवायच पार पडला. ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी असून नात्यांमधील वाढत्या दुराव्याचं वेदनादायी वास्तव पुन्हा एकदा समोर आणते.

Total Visitors :
4654148
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *