मंडणगड-म्हाप्रल मार्गावर शेनाळे येथे दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Gramin Varta
217 Views

मंडणगड : तालुक्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, डोंगराळ भागात मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपल्याने दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. मंडणगड-म्हाप्रल मार्गावरील शेनाळे गावच्या हद्दीत, देशमुख बागेजवळ डोंगराची मोठी दरड कोसळल्याने या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे.

रस्त्यावर मातीचे ढीग, मोठमोठे दगड आणि झाडे-झुडपे आल्यामुळे या वर्दळीच्या मार्गावरील संपर्क तुटला आहे. हा मार्ग लोणंद-राजावाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असून, तो मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यांना मुंबई, पुणे व ठाणे शहरांशी जोडणारा प्रमुख दुवा आहे. आधीच सावित्री नदीवरील आंबेत पुलाखाली बार्ज अडकल्याने तिथली वाहतूक बंद आहे, त्यातच आता शेनाळे येथे दरड कोसळल्याने प्रवाशांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या दुहेरी संकटामुळे परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, प्रशासनाने तात्काळ मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे.

Total Visitors :
4820519
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *